मुंबई: आयपीएल २०२४च्या लिलावाच्या आधी मुंबई इंडियन्स संघात एक मोठा बदल झाला आहे. मुंबई संघाने लखनौ सुपर जायंट्सच्या रोमारिओ शेफर्ड याला ट्रेड करून संघात घेतले आहे. शेफर्ड हा वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर असून त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ मॅच खेळल्या आहेत. आयपीएल २०२३ मध्ये शेफर्डने लखनौकडून फक्त एक मॅच खेळली होती. ज्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.
शेफर्ड लखनौच्या आधी आयपीएल २०२२ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता. हैदराबादने त्याला ७.७५ कोटींमध्ये खरेदी केले होते. पण त्यानंतर २०२३ मध्ये लखनौ संघाने त्याला फक्त ५० लाख रुपयांच्या बेस प्राईसवर संघात घेतले. आयपीएलमधील चार लढतीत शेफर्डने ५८ धावा केल्या असून गोलंदाजीत ३ विकेट घेतल्या आहेत.
आयपीएल २०२४च्या लिलावाआधी संघ खेळाडूंना ट्रेड करू शकतात. लिलावाच्या एक महिना आधी रिटेन आणि रिलीझ खेळाडूंची यादी जाहीर करावी लागते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबरपर्यंत ही यादी जाहीर करावी लागू शकते. दरम्यान आयपीएल २०२४साठीचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत होणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. रिटेन आणि रिलिझ खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अखेरची तारीख २६ नोव्हेंबर ही ठेवण्यात आली आहे. गेल्यावेळी आयपीएलचा लिलाव कोच्चीत झाला होता. आता पुन्हा एकदा संघ आपल्या आवडत्या खेळाडूंवर बोली लावतील.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे.