मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून गुजरात टायटन्सकडे गेलेला हार्दिक पांड्या घरवापसी करणार आहे. पांड्या पुन्हा मुंबईच्या संघात दाखल होणार आहे. पांड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरातनं एकदा आयपीएल जिंकली आहे. IPL 2024
मुंबई: IPL 2024 इंडियन प्रीमियर लीगच्या २०२४ साठीचा लिलाव १९ डिसेंबरला दुबईत होणार आहे. या लिलावाआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्सचा विद्यमावन कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होणार आहे. हार्दिक पांड्यानं २०१५ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएल पदार्पण केलं होतं. आता त्याची घरवापसी होणार आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोनं दिलेल्या वृत्तानुसार, पांड्याला मुंबई इंडियन्समध्ये घेण्यासाठीचा व्यवहार पूर्णत: रोख स्वरुपात होईल. पांड्याला आपल्याकडे घेण्यासाठी मुंबईचा संघ गुजरात टायटन्सला १५ कोटी रुपये देईल. हा व्यवहार यशस्वी झाल्यास तो आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा प्लेयर ट्रेड असेल. दोन्ही फ्रेंचायजींनी अद्याप तरी याबद्दलची कोणतीही माहिती अधिकृतपणे दिलेली नाही.
आयपीएल २०२३ च्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये केवळ ०.०५ कोटी रुपये (जवळपास ६ हजार डॉलर) शिल्लक होते. येणाऱ्या लिलावाआधी फ्रेंजाइजींना ५ कोटी रुपये अतिरिक्त मिळतील. याचा अर्थ हार्दिकला संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स काही खेळाडूंना रामराम करेल. खेळाडूंची रिटेंशन डेडलाईन २६ नोव्हेंबरला संध्याकाळी ४ वाजता संपेल.
२०२२ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरात टायटन्सनं आयपीएलचं जेतेपद पटकावलं. विशेष म्हणजे गुजरातनं पदार्पणाच्या वर्षातच ही किमया साधली. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातनं विजय मिळवला.